Home क्राईम चोपडा तालुक्यात गांजाची शेती उद्ध्वस्त ! १,८७० किलो अंमली पदार्थ जप्त ; किंमत तब्बल ४ कोटी ६७ लाख रुपये

चोपडा तालुक्यात गांजाची शेती उद्ध्वस्त ! १,८७० किलो अंमली पदार्थ जप्त ; किंमत तब्बल ४ कोटी ६७ लाख रुपये

0
चोपडा तालुक्यात गांजाची शेती उद्ध्वस्त ! १,८७० किलो अंमली पदार्थ जप्त ; किंमत तब्बल ४ कोटी ६७ लाख रुपये

चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात अंमली पदार्थांच्या अवैध लागवडीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. खान्यापाडाव गावाच्या शिवारातील वन विभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक २४० मधील जमिनीवर बेकायदेशीरपणे लागवड करण्यात आलेली गांजासदृश अंमली पदार्थांची झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईत तब्बल १ हजार ८७० किलो वजनाचा गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजित किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांची कारवाई सुरू होताच घटनास्थळावरून पसार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान्यापाडाव, ता. चोपडा येथील जुम्मा आरसी पावरा हा इसम वन विभागाच्या कंपार्टमेंट क्रमांक २४० मधील जमीन कसत होता. या जमिनीवर त्याने प्रतिबंधित गांजासदृश अंमली पदार्थाच्या वनस्पतींची बेकायदेशीर लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या वनस्पतींची लागवड करून त्यांचे संवर्धन आणि जोपासना करण्यात येत असल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संबंधित ठिकाणी कारवाई केली. घटनास्थळावर पाहणी केली असता शेतात गांजासदृश अंमली पदार्थाची हिरवीगार, ओलसर आणि ताजी झाडे आढळून आली. या झाडांची उंची सुमारे ४ ते ६ फूट होती. झाडांना पाने, फांद्या आणि मुळे होती. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेत त्याचे वजन केले.

या कारवाईत स्वराज कंपनीच्या एमएच १९ ईए ३६२५ क्रमांकाच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये ठेवलेला गांजासदृश वनस्पतींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती, चोपडा येथील वजनकाट्यावर करण्यात आलेल्या वजनानुसार ट्रॅक्टरसह मालाचे वजन ६ हजार २६० किलो, तर रिकाम्या ट्रॅक्टरचे वजन ४ हजार ३९० किलो नोंदविण्यात आले. त्यानुसार गांजासदृश पिकाचे निव्वळ वजन १ हजार ८७० किलो भरले. प्रति किलो २५ हजार रुपये या दराने या मुद्देमालाची एकूण किंमत ४ कोटी ६७ लाख ५० हजार रुपये निश्चित करण्यात आली. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालातून नमुन्यासाठी हिरवी पाने, फांद्या आणि बिया असलेली झाडे वेगळी काढून ठेवली आहेत. तसेच संबंधित शेतातील मातीचा आणि गांजासदृश झाडांच्या मुळांना लागलेल्या मातीचा नमुनाही पुढील रासायनिक तपासणीसाठी घेतला आहे. या नमुन्यांच्या तपासणीतून जप्त करण्यात आलेल्या वनस्पतींचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरू झाल्याचे लक्षात येताच संशयित जुम्मा आरसी पावरा हा घटनास्थळावरून पळून गेला. त्यामुळे या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पसार संशयिताचा शोध घेण्यासह या अवैध लागवडीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय सोनवणे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. पोलीस पथकाच्या या कारवाईमुळे चोपडा तालुक्यातील अवैध अंमली पदार्थांच्या लागवडीचा गंभीर प्रकार समोर आला आहे.