जळगाव, प्रतिनिधी | महापालिकेने जुना विकास आराखडा पूर्ण न करता नवा आराखडा प्रस्तावित केला आहे. हा नवीन आराखडा रद्द करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी आज (दि.१४) एका पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवाजीनगर वासियांसोबत लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी २७ वर्षात मोठा छळ केला आहे. शिवाजीनगर उड्डाणपूल पडून जवळपास १० महिने झाले आहेत परंतु, अद्यापही शिवाजीनगर वासियांनी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासन, आमदार, खासदार तसेच अन्य लोकप्रतिनिधी या समस्येकडे गंभीरतेने पाहत नसल्याचा आरोप गुप्ता यांनी यावेळी केला. यासाठी तत्कालीन आमदार सुरेश जैन यांच्यापासून विद्यमान आमदार सुरेश भोळे यांच्यापर्यत व तत्कालीन न.पा. मुख्याधिकाऱ्यापासून विद्यमान आयुक्तांपर्यंत सर्वजण जबाबदार आहेत. महापालिकेतर्फे शहरातील सर्वच भागात विकास कामे केली जात असतांना शिवाजीनगरच्या विकासासाठी लक्ष दिले गेलेले नाही. राज्य शासनाने २७ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९३ साली डी.पी. प्लॅननुसार शहराला शिवाजीनगर सोबत जोडण्यासाठी विकास योजनेत दोन उड्डाण पुलांची मंजुरी देऊन या पुलासोबत २४ मीटरचे दोन रस्ते मंजूर केले होते. परंतु, त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी २०२४ चे डी.पी. प्लॅन तयार करण्यात येत आहेत. तो डी.पी. प्लॅन रद्द करण्यात यावा, अशी मागणीही गुप्ता यांनी यावेळी केली. जळगाव महापालिका आयुक्त व मनपा सहाय्यक नगर रचनाकार यांच्याबाबत संबंधित अधिकारी, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत मनपा आयुक्त व सहाय्यक नगर रचनाकार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या चौकशी दरम्यान त्यांचे ग्रॅज्युईटी व इतर फंड थांबविण्यात यावेत, अशी मागणीही आपण केली असल्याचे गुप्ता यावेळी म्हणाले.