नगरसेवक कैलास सोनवणेंवर प्रॉपर्टी जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठी घर पाडण्याचा आरोप (व्हीडीओ)

813fba2e 49f0 4901 be24 e0565e842e8a

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आकाशवाणी चौकालगत जैन स्वाध्याय जवळील गडकरी नगरातील एक दुमजली इमारतीची बाल्कनी आणि जिना बेकायदेशीर असल्याचे सांगत महापालिकेच्या कर्मचारींनी आज सकाळी तोडफोड करायला सुरुवात केली. परंतू थोड्यावेळातच आम्हाला पूर्ण घर पाडण्याचे आदेश असल्याचे पूर्ण घर पडण्याची तयारी सुरु केली. यावेळी घरात असलेल्या परिवाराने नगरसेवक कैलास सोनवणेंवर प्रॉपर्टी जबरदस्तीने ताब्यात घेण्यासाठी घर पाडत आरोप असल्याचा आरोप केला. एवढेच नव्हे तर, आम्हाला मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची धमकी दिल्याचे देखील म्हटले. दरम्यान, घर पडत असतांना कुटुंबियांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. दरम्यान, या संदर्भात नगरसेवक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

 

शहरातील आकाशवाणी चौकालगत जैन स्वाध्याय जवळील गडकरी नगरातील एक दुमजली आहे. या घरात आजच्या घडीला तुषार गोविंदा गायकवाड हे आपल्या परिवारासह राहतात. गायकवाड परिवार संयुक्तरित्या राहत असून आजच्या घडीला १५ सदस्य या ठिकाणी राहतात. आज सकाळी साधारण ११ वाजेच्या सुमारास इमारतीची बाल्कनी आणि जिना बेकायदेशीर असल्याचे सांगत महापालिकेच्या कर्मचारींनी तोडफोड करायला सुरुवात केली. सुरुवातीला अतिक्रमण आहे म्हणून तोडफोडला विरोध केला नाही. परंतू थोड्यावेळातच कर्मचाऱ्यांनी आम्हाला पूर्ण घर पाडण्याचे आदेश असल्याचे सांगितल्या नंतर मात्र, गायकवाड परिवाराच्या पायाखालील वाळूच सरकली. महापालिकेचे कर्मचारी कुणाचे खाजगी घर कसे पाडू शकतात? असा सवाल तुषार गायकवाड यांनी उपस्थित केला. गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले की, हे घर आमच्या आजोबांच्या नावावर होते. कुटुंबात हिस्से वाटणीवरून वाद असल्याने आम्ही २०१२ मध्ये कोर्टात केस दाखल करून सर्व नातेवाईकांना सारखा हिस्सा मिळाला पाहिजे,असा आर्ज करून ठेवला होता. परंतु २०१५ मध्ये नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आजोबांकडून जबरीने घर खरेदी करून घेतले. आजोबांनी घरी आल्यावर आम्हाला हकीगत सांगितली. त्यानंतर आम्ही या संदर्भात कोर्टात केस दाखल केलेली आहे. त्यावर आम्हाला स्टे देखील मिळालेला आहे. आजच्या घडीला घराचा ताबा आमच्याकडे आहे. घर खाली करण्यासाठी आम्हाला नगरसेवक सोनवणे यांनी अनेकवेळा धमक्या दिल्या. एवढेच नव्हे तर, गिरीश महाजन यांच्या नावाचा धाक देखील दाखवला. परंतू आम्ही घाबरलो नाहीत. म्हणून आज घर पाडून ही प्रॉपर्टी ताब्यात घ्यायची असल्याचा आरोप देखील श्री. गायकवाड यांनी केला आहे.

 

 

दुसरीकडे नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आमच्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहेत. उद्या याबाबत पत्रकार परिषद घेऊन सर्व पुरावे दाखवणार आहोत. त्यांनी गायकवाड परिवाराचे सर्व आरोप देखील फेटाळून लावले. दरम्यान,शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, महापालिकेच्या पथकाने कारवाई थांबवलेली होती. तर गायकवाड परिवार आणि त्यांचे वकील थोड्यावेळात पत्रकार परिषद घेणार असल्याचे कळते. दरम्यान, संपूर्ण परिवार घरात राहत असतांना महापालिका संपूर्ण घरं कसं पाडू शकते? अशी चर्चा घटनास्थळी सुरु होती. तर गायकवाड परिवाराचा आक्रोश मन हेलावून सोडत होता.

 

Add Comment

Protected Content