पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी रात्री उशीरा २६ मतदारसंघांची यादी जाहीर केली असून यात पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतील अर्ज माघारीसाठी काही तास उरलेले असतांना रात्री उशीरा आपली भूमिका जाहीर केली. यात त्यांनी २६ जागांवर आपले उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. यात 13 जागांचे उमेदवार त्यांनी जाहीर केले असून १३ नावे ते नंतर जाहीर करणार आहेत.
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. येथून लढा देण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र अद्याप उमेदवार जाहीर केलेले नाही. यामुळे येथून जरांगे यांच्या पाठींब्यावर नेमका कोण उमेदवार निवडणूक लढणार ? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पाचोऱ्यातून आधीच बहुरंगी मुकाबला होणार असून यात आता जरांगे हे देखील एका उमेदवाराला पाठींबा देणार असल्याने येथील लढत ही अधिक मनोरंजक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अपडेट : दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज दिनांक 4 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपल्या भूमिकेवरून घुमजाव करत निवडणूक लढविणार नसल्याची घोषणा केली आहे. यामुळे पाचोरा येथून उमेदवार देण्याचा मुद्दा हा काही तासांमध्येच बाद ठरला आहे.