यावल तालुक्यात केबल चोरीचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, पोलीस गस्त वाढवण्याची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील दहिगावजवळ असलेल्या बोराळे शिवारात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपांच्या केबल चोरून नेल्या आहेत. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त करत शेतशिवारात रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

घडलेल्या घटनेनुसार, ७ एप्रिलच्या रात्री बोराळे शिवारात देविदास धांगो पाटील यांच्या सहा विद्युत पंपांच्या केबल चोरीला गेल्या. यासोबतच किशोर मधुकर महाजन, रतन मेघश्याम चौधरी, बाळू लक्ष्मण पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या शेतविहिरींमधील वीज पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी तोडून चोरून नेल्या. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. सध्याच्या परिस्थितीत वाढत्या तापमानामुळे शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशा स्थितीत विद्युत पंपांच्या केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांना पाणी देणे अत्यावश्यक असताना चोरट्यांच्या या कृत्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, पोलीस प्रशासनाचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.

शेतकऱ्यांनी पीक संरक्षण संस्था आणि पोलीस प्रशासनाला संयुक्तपणे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून शेती साहित्यांच्या होणाऱ्या चोऱ्या थांबवता येतील. यावल तालुक्यातील दहिगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, यामुळे शेतकरी वर्ग अधिकच त्रस्त झाला आहे. तातडीने यावर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Protected Content