मुंबई प्रतिनिधी । उध्दव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणखी लांबणीवर पडणार आहे. येत्या दि.२३ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे कालपर्यंत सांगितले जात असतांना मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय आता दिल्लीत होणार असल्याचे समजते. त्यासाठी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सोमवारी दिल्लीला जाणार आहेत.
विस्ताराबाबत थोरात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतरच काँग्रेसमधील भावी मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. काल अजित पवार यांनी २३ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती दिली होती. मात्र सोमवारी दिल्लीत विस्ताराबाबत चर्चा असल्यामुळे सोमवारनंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.