मुरादाबाद, वृत्तसंस्था | CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर CAA ला होणारा विरोध हादेखील चिंतेचा विषय नसल्याचे भागवत यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा हा देशहिताचा कायदा आहे. मात्र काही लोक CAA वरुन जनतेत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा भ्रम जनतेच्या मनातून दूर केला जावा, ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे आवाहनही मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना केले आहे. मुरादाबादमध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती समोर आली आहे.
CAA, NRC या मुद्द्यांवरुन देशातल्या काही राज्यांमध्ये गदारोळ सुरु आहे. महाराष्ट्रातही सुधारित नागरिकत्व कायदा लागू होऊ देणार नाही, असे छगन भुजबळ यांनी गेल्या आठवड्यात म्हटले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही CAA ला कडाडून विरोध दर्शवला आहे. या विरोधात आंदोलनेही करण्यात आली. तसेच CAA च्या समर्थनार्थही आंदोलने करण्यात आली. याच सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मागे हटण्याची गरज नाही, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. CAA मागे घेण्यात यावा, हा देशहिताचा कायदा नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र सरसंघचालक मोहन भागवत यांनी या विरोधाची चिंता करण्याची गरज नाही, असे म्हटले आहे.
सुधारित नागरिकत्व कायदा देशात लागू झाला आहे. उत्तर प्रदेश हे या कायद्याची अमलबजावणी करणारे पहिले राज्य ठरले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत लोक काहीसे संभ्रमावस्थेत आहेत. हा संभ्रम त्यांच्या मनातून दूर करणे हे देखील आपले काम आहे, असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. मुरादाबाद येथे स्वयंसेवकांशी संवाद साधत असताना मोहन भागवत यांनी हे विधान केले आहे. याचवेळी त्यांनी देशात दोन मुले जन्माला घालण्याचा कायदा अस्तित्त्वात यायला हवा असेही म्हटले आहे.