जळगाव, प्रतिनिधी | मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांना आमचा पाठींबा असून ते आमचे पुरस्कृत उमेदवार असतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेश निरीक्षक करण खलाटे यांनी आज (दि.७) येथे स्पष्ट केले. येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी योगेश देसले, विकास पवार, विलास पाटील आदी उपस्थित होते.
या निर्णयाने मुक्ताईनगर मतदार संघातील रा.कॉ.चे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांना माघार घ्यावी लागल्याने ते नाराज होवून त्यांनी पदाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. याबाबत खलाटे यांना विचारले असता ते म्हणाले की, रवींद्र पाटील यांची निवडणूक लढवण्याची इच्छाच नव्हती, असे सांगितले. तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते म्हणाले. एकनाथराव खडसे यांना कोणत्याही प्रकारची ऑफर दिलेली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही विचारांची लढाई असून कोणा व्यक्तीविरोधात नाही. जिल्ह्याचा विकास झालेला नसल्याने परिवर्तन निश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विकास हाच मुद्दा घेऊन आपण लढत आहोत. यासाठी चंद्रकात पाटील यांना पुरस्कृत केले असून भाजपचे काही लोक आपल्याला मदत करत असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. उद्या पक्षाध्यक्ष शरद पवार हे पारोळा येथे सायंकाळी ५.०० वाजता प्रचाराचा शुभारंभ वाजता करणार आहेत. तसेच दुसऱ्या दिवशी पवार हे जिल्ह्यातील पदाधिकारी यांची आढावा बैठक घेणार आहेत, असेही ते म्हणाले.