मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | विद्यार्थी आणि नागरिकांची प्रवासाची समस्या सुटली असून आज सोमवार दि १९ सप्टेंबर रोजी कोऱ्हाळा गावाची बसफेरी सुरू झाली आहे.
तालुक्यातील कोऱ्हाळा येथील शंभरच्या आसपास विद्यार्थी शिक्षणासाठी कुऱ्हा येथे प्रवास करत असतात; गावात असलेल्या अतिक्रमणामुळे बस फिरायला अडचणी येत असल्यामुळे बस बंद झाली होती. त्यामुळे कुऱ्हा येथे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. विद्यार्थ्यांना खाजगी प्रवासी वाहनाने कुऱ्हा येथे जावे लागत होते. यात विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता.
रोहिणीताई खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुरू केलेली जनसंवाद यात्रा दि १२ सप्टेंबर रोजी कोऱ्हाळा येथे आली असता विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी बसबाबतची समस्या त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडली.
रोहिणीताई खडसे यांनी ग्रामस्थांना बसच्या मार्गात येणारे उकिरडे व इतर अतिक्रमण दूर करून देण्याचे आवाहन केले होते ते दूर झाल्यानंतर बस सुरू करण्यासाठी पाठपुरावा करेल असे आश्वासन दिले होते. ग्रामस्थांना केलेल्या आवाहना नुसार ग्रामस्थांनी बसच्या मार्गातील अडथडे दूर केल्यानंतर रोहिणीताई खडसे यांनी दि १५ सप्टेंबर रोजी मुक्ताईनगर बस आगाराचे आगार व्यवस्थापक साठे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत कोऱ्हाळा येथील बस सुरू करण्याबाबत चर्चा केली होती.
आज सोमवार दि १९ सप्टेंबर रोजी कोऱ्हाळा गावाची बसफेरी सुरू झाली आहे. आज कोऱ्हाळा गावात बस पोहचली असता ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी बसचे चालक आणि वाहक यांचा सत्कार केला. बस फेरी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची आणि ग्रामस्थांची कुऱ्हा व इतर ठिकाणी जाण्यासाठी होणारी गैरसोय दुर होणार आहे यातून ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. बस फेरी सुरू होण्यासाठी कोऱ्हाळा येथील उपसरपंच प्रविण कांडेलकर, संतोष कांडेलकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि सहकार्य आणि पाठपुरावा केला.