पाचोरा, प्रतिनिधी | तालुक्यातील गिरड रस्त्यावर काकणबर्डी ते ओझर गावांदरम्यान आज सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास पाचोरा-एरंडोल बस आणि फोर्ड फिगो कार यांची समोर-समोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका लहान मुलीसह दोन जण ठार तर सात-आठ जण जखमी झाल्याची घटना घडली.
अधिक माहिती अशी की, पाचोरा येथून एरंडोलकडे जाणाऱ्या बसने (क्र.एम.एच.२०, डी.९५३८) ने एरंडोलकडून पाचोरामार्गे पिंपळगाव हरेश्वरकडे रथ यात्रेसाठी निघालेल्या पाटील-मराठे कुटुंबियांच्या फोर्ड फिगो कारला धडक दिल्याने कारमधील एका बालिकेसह दोन जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये बापू रघुनाथ मराठे (वय ५५) व परी दत्तात्रय पाटील (वय ६) यांचा समावेश आहे. कारमधील अन्य चौघे जण तर बसमधील सात-आठ प्रवासी जखमी झाले आहेत. बसमध्ये सुमारे १५ प्रवासी होते तर मारुती कारमध्ये सहा जण होते.
जखमींमध्ये बसमधील प्रवासी सुभाषचंद्र समधानी (वय ७२) रा. पाचोरा, वनसिंग युवराज सरदार (वय ४४) रा.कनाशी, मीना सुरेश जाधव (वय २५) रा.पहूर तर कारमधील गौरव बापू मराठे (वय १६), ओम दत्तात्रय पाटील व रेखा दत्तात्रय पाटील व मयुरी दत्तात्रय पाटील रा. धरणगाव व एरंडोल यांचा समावेश आहे.
जखमींना पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमी प्रवाशांना एस.टी. महामंडळातर्फे प्रत्येकी एक हजार रुपये मदत देण्यात आली आहे.