मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव ते काटेलधाम या बसला मुक्ताईनगर तालुक्यात अपघात झाला असून यात नऊ प्रवासी जखमी झाले आहेत.
या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगर आगाराची एमएच २० बीएल-१७७० या क्रमांकाची बस आज जळगाव येथून निघून काटेलधामकडे येत होती. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावाजवळ असलेल्या पारंबी फाट्याजवळ बसचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली. आज सकाळी हा अपघात घडला.
या अपघातामध्ये नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यात प्रतीक्षा सुनील झांबरे ( २२, रा. आळंद ); समाधान उखर्डु तायडे ( ६९, रा. मानेगाव ); कमल गोविंदा पवार ( ५९, रा. वढोदा ); जानकोर त्र्यंबक महाले ( ७५, रा. वढोदा); नलीनी भास्कर न्हावी ( ७०, रा. वढोदा); अनुराधा पाटील ( ३५, मेळसांगवे); कस्तुराबाई भोलणकर ( ७०, रा. शिरसोली); सपना विनोद पाटील ( २७, रा. जामनेर); सार्थक विनोद पाटील (२, रा. जामनेर) यांचा समावेश आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यात कुर्हा येथील शिवसेनेचे शहरप्रमुख पंकज पांडव यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना स्वत: रूग्णवाहिकेत टाकून स्वत: चालवत उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. या रूग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सुदैवाने या अपघातात प्राणहानी टळली आहे.