नशिराबाद येथील घरफोडीतील संशयिताला अटक

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मन्यारखेडा येथील फातेमा नगरातील घरातून रोकडसह दोन मोबाईल लांबविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

अधिक माहिती अशी की, इम्रान शरीफ खान (वय-३६) रा. फातेमा नगर मन्यारखेडा ता.जि.जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ३१ मे २०२१ रोजीच्या मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या दरम्यान घरातील सर्व सदस्य झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटातून रोकड आणि दोन मोबाईल असा एकुण २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आले होते. याप्रकरणी इम्रान खान यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या गुन्ह्यातील पाहिजे असलेला संशयित आरोपी हा जळगावातील काशिनाथ चौकात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, पोना नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, चा.स.फौ राजेंद्र पवार आदींनी संशयित आरोपी हमीद खान अय्युब खान (वय-१९) रा. गणेशपुरी, मेहरूण जळगाव याला दुपारी अटक केली. पुढील कारवाईसाठी त्याला नशिराबाद पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content