रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरातील अष्टविनायक नगर आणि महात्मा फुले चौक येथे घरफोडीच्या दोन घटनांमध्ये सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अष्टविनायक नगर येथे राहणारे योगेश हरी मोरे हे १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी कामानिमित्त भुसावळ येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख १० हजार रुपये असा एकूण १ लाख ७ हजार ४२० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दुसरी घटना महात्मा फुले चौकातील सचिन नामदेव महाजन यांच्या घरात घडली. चोरट्यांनी कपड्यांमध्ये ठेवलेले ३२ हजार रुपये रोख लंपास केले. या दोन्ही घटनांवरून योगेश मोरे यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले तपास करत आहेत.