जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या एका किराणा दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री डल्ला मारला आहे. या घटनेत दुकानाचे शटर तोडून गल्ल्यातील रोख रक्कम लंपास करण्यात आली असून, यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मिथिला अपार्टमेंट, राजा ट्रॅक्टर समोर असलेल्या ‘गायत्री किराणा’ दुकानात ही चोरीची घटना घडली. दुकानाचे मालक राजकुमार सतन सिंग (वय ४५ वर्षे, रा. सत्यम पार्क) यांनी नेहमीप्रमाणे दुकान बंद केले होते. मात्र, २३ जानेवारीच्या रात्री १०:३० ते २४ जानेवारीच्या सकाळी ७:०० वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी संधी साधत दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले.

चोरट्यांनी दुकानात अनाधिकृतपणे प्रवेश करून काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली अंदाजे २५,००० रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. सकाळी जेव्हा मालक दुकान उघडण्यासाठी आले, तेव्हा त्यांना शटर वाकलेले आणि कुलूप तुटलेले दिसले. दुकानातील सामानाची उचकापाचक झालेली पाहून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळी भेट दिली. राजकुमार सिंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि सुनील पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.



