जळगाव, प्रतिनिधी | शहरातील एम.आय.डी.सी. परिसरातील राधेशाम कॉलनीतील रहिवासी संदीप कडूबा नैनाव हे दिवाळीसाठी आपल्या मूळ गावी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे गेले असता त्यांच्या घरी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत चोरट्यांनी पाच हजार रुपये रोख व एक ग्रॅमचे दागिने असा आठ हजारांचा ऐवज लांबवला आहे.
संदीप नैनाव हे पत्नी मंगल, मुलगी अनुष्का व अरुणा या कुटुंबासह राधेशाम कॉलनीतील प्लॉट नं ५, ब्लॉक नं ६ येथे वास्तव्यास आहेत. अॅबोट हेल्थ केअर या कंपनीत ते औषधी विक्री प्रतिनिधी म्हणून नोकरीला आहेत. २७ ऑक्टोबर रोजी ते दिवाळीसाठी गावी गेले होते. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.०० वाजता शेजारी शरद तेली यांनी फोन करुन नैनाव यांना तुमच्या घराचे कुलूप उघडे दिसले. चोरीची खात्री झाल्यावर नैनाव कुटुंबिय घरी परतले.
त्यावेळी त्यांच्या घराचे चॅनल गेट व मुख्य दरवाजाचे कडी-कोयंडे तोडलेले होते, तसेच घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. चोरट्यांनी लाकडी कपाटातील नैनाव यांच्या मुलीची पाच हजार रुपये असलेली पिगी बँक तसेच सोन्याचे एक ग्रॅमचे पेंडल असा आठ हजारांचा ऐवज लांबवल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.