Home Uncategorized भरदिवसा घरफोडी: तरूणाच्या घरातून ६३ हजारांच्या दागिन्यांची चोरी !

भरदिवसा घरफोडी: तरूणाच्या घरातून ६३ हजारांच्या दागिन्यांची चोरी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील टी.एम. नगरातील उज्ज्वल अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका तरुणाच्या बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६३ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बुधवारी (१३ ऑगस्ट) दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज शंकरलाल तोलानी (वय ३५, रा. उज्ज्वल अपार्टमेंट, टी.एम. नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहेत. ६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून चोरट्यांनी पोबारा केला.

या घटनेची माहिती मिळताच पंकज तोलानी यांनी बुधवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चोरीचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील हे करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी तात्काळ चोरट्यांना अटक करावी अशी मागणी होत आहे.


Protected Content

Play sound