जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून चोरी केलेल्या दुचाकी १०० रूपयांच्या स्टॅम्पपेपर बनवून विकत असलेल्या ‘बंटी और बबली’ या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या ताब्यातील तब्बल २५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आले आहे. दोघांना आज न्यायालयात हजर केले असता २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
निवृत्ती उर्फ छोटु सुकलाल माळी (48, रा.मोठा माळी वाडा, धरणगाव) व हेमलता देविदास पाटील (34, व्हाईट बिल्डींग, खड्डाजीन समोर, अमळनेर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे आरोपींच्या ताब्यातून ज्यांनी दुचाकी स्टॅम्प पेपरवर खरेदी केल्या अशा २४ ग्राहकांवरही आता पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
स्टॅम्प पेपरवर दुचाकी विक्री
पथकातील हवालदार संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख यांना अमळनेर शहरातील एक महिला व धरणगाव शहरातील एक पुरुष हे सोबत जळगाव जिल्ह्यात फिरुन दुचाकींची चोरी करून त्यांची शंभर रुपयांच्या स्टॅप पेपरवर ग्राहकांना विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. विशेष म्हणजे आरोपी हेमलता पाटील ही स्वतः पुरूषांच्या वेशात दुचाकी चोरी करायची व आरोपी निवृत्ती माळी हा 10 ते 15 फूट अंतरावरून दुचाकी मालकावर लक्ष ठेवत होता.
चोरीच्या 25 दुचाकी जप्त
आरोपींच्या ताब्यातून बजाज प्लॅटीना – 03 , हिरो पॅशन प्रो – 10, हिरो स्लेंडर – 04 , हिरो डिलक्स् – 05 , होंडा शाईन – 02, बजाज सीटी- 01 अश्या एकुण 25 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत शिवाय आरोपींनी ज्या 25 ग्राहकांना ही वाहने विकली त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता – सन 1860 चे कलम 411 अन्वये गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. आरोपींना अधिक तपासार्थ एरंडोल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
यांनी केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, एएसआय अशोक महाजन, हवालदार संजय सपकाळे, सुधाकर अंभोरे, अश्रफ शेख, दत्तात्रय बडगुजर, विनायक पाटील, किरण चौधरी, महेश महाजन, पल्लवी मोरे, वैशाली पाटील, राजु पवार, इंद्रीस पठाण तसेच विजय पाटील, नरेंद्र वारुळे आदींनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.