सोयगाव प्रतिनिधी | तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत बैलपोळा सण शांततेत साजरा करण्यात आल्याची माहिती तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दिली.
यंदाच्या पोळ्यात मुक्या जनावरांच्या सजावटीचे उपदेश शेतकऱ्यांना लाभदायक ठरले. यंदाच्या पोळा सणात सोयगाव तालुक्यात सजावटीवर जोर देण्यात येवून शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी बैलांवर विविध घोषवाक्य लिहून शेतकऱ्यांना उपदेश देण्यात आले. यात काही भागात बेटी बचाव, काश्मीर प्रश्न, स्वच्छता अभियान, घरोघरी शौचालये आदी घोषणा लिहून शेतकऱ्यांच्या बैलांनी गावभर जनजागृती केली. सायंकाळी ४.०० वाजता गावाच्या वेशीत बैलांना गोळा करून पारंपारिक पद्धतीत पोळा सण शांततेत साजरा करण्यात आला. यावेळी महसूल कर्मचारीही पोलिसांच्या दिमतीला बंदोबस्तात असल्याने तालुक्यात यंदा शांततेत पोळा सण साजरा करण्यात आला.
घोसला गावात मानाचा पोळा
तालुक्यात घोसला या गावात सालाबादप्रमाणे मानाच्या बैलाचा पोळा साजरा करण्यात येतो या गावाची परंपरा आगळीवेगळी आहे.यंदाचा पोळ्याचा मान गवळी कुटुंबियांना देण्यात आली होती.त्यामुळे गवळी कुटुंबियांच्या घराची शिदोरी आणून बैलांची विधिवत पूजा करून बैलपोळा फुटला यावेळी मात्र मानाच्या बैलाच्या मागे गावातील सर्वच बैल धावत होते,परंतु मानाच्या बैलाच्या पुढे कोणताही बैल गेला नाही त्यामुळे घोसल्याचा शिस्तीचा पोळा जिल्हाभर प्रसिद्ध आहे. यंदाच्या पोळा सणात चक्क मुक्या जनावरांनी विविध उपदेश सजावटीतून दिल्याने यंदाचा पोळा उपदेशाचा पोळा ठरला आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्या, काश्मीर प्रश्न, स्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, मतदान जनजागृती, शेतकरी निवृत्ती वेतन योजना आदी मुद्द्यांवर चक्क बैलांनी बैलपोळ्याच्या सणात जनजागृती केली आहे.