बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मेहकर येथे २६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी जळगावच्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुटखा तस्करीचे धागेदोरे अनेकदा जळगाव जिल्ह्यापर्यंत जुडलेले असल्याचे दिसून येते. गेल्या काही महिन्यात चाळीसगाव तालुक्यात पोलिसांनी अनेकदा कारवाई करून तस्करांना जेरबंद केले आहे. मात्र खूप प्रयत्न करून देखील गुटखा तस्करी बंद होतांना दिसून येत नाही. यातच आता जिल्ह्यातील तस्करांनी दुसर्या जिल्ह्याकडे मोर्चा वळविल्याचे दिसून आले आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथील कारवाईत जळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, मध्यप्रदेशातून बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथे एका ट्रकमधून गुटखा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी एमएच०४ ईबी ९८७२ क्रमांकाच्या ट्रकसह तिघांना ताब्यात घेतले आहे. यात २६ लाख रूपयांचा गुटखा आणि ट्रकसह एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी अजय गजानन गोसावी आणि सागर यशवंत औतार हे जळगावातील रहिवासी असून गजानन मापारी हा लोणार येथील रहिवासी आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पंकज सपकाळे आणि त्यांच्या सहकार्यांनी केली.