बुलढाणा प्रतिनिधी । विधानसभा निवडणूकीत उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद करावी. त्यासाठी नियुक्त पथकांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी दिल्या.
विधानसभा मतदारसंघनिहाय स्थायी, व्हिडीओ सर्वेलान्स व सहायक खर्च निरीक्षक यांची बैठक निवडणूक खर्च निरीक्षक यांच्यासमवेत जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर मलकापूर, खामगांव व जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक ब्रजेश कुमार, बूलडाणा व चिखली विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक किण्व बाली, आयकर विभागाचे श्रवण कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील – भुजबळ, उपजिल्हाधिकारी गौरी सावंत आदी उपस्थित होते.
पथकांमधील सदस्यांनी काम करताना मिळालेल्या न्यायिक अधिकारांचा उपयोग करण्याच्या सूचना देत खर्च निरीक्षक किण्व बाली म्हणाले, व्हिडीओ सर्वेलान्स पथकाने चेक नाक्यांवर वाहन तपासणी करताना पुर्ण पुरावे व्डिीओत घ्यावे. जाहीर सभांमध्ये प्रत्येक खर्चाची नोंद घ्यावी. ही नोंद घेण्यासाठी शॅडो रजिस्टर देण्यात आले आहे. शॅडो रजिस्टर व उमेदवारांनी सादर केलेला खर्च याचा ताळमेळ लावावा. कुठल्याही परिस्थितीत उमेदवाराने केलेला खर्च सोडू नये. हे काम करताना न्यायपूर्वक व्यवहार ठेवत दबावाला बळी पडू नये. रॅलीमधील पूर्ण वाहनांचे शूटींग घ्यावे. त्यामध्ये प्रकर्षाने वाहन क्रमांक आले पाहिजेत.
खर्च निरीचक ब्रजेश कुमार म्हणाले, तपासणी नाक्यांवर संशयीत व उमेदवारासंबंधीत प्रत्येक वाहन चेक करावे. कॅश सापडल्यास त्वरित निवडणूक निर्णय अधिकारी यांना माहिती द्यावी. पोलीसांच्या सहकार्याने पुढील कार्यवाही करावी. रोख रकमेबाबत संबंधिताकडे कागदपत्रे नसल्यास गुन्हा दाखल करावा. त्याचप्रमाणे केवळ वाहनांची नाही, तर जाहीर सभांच्यावेळी येणाऱ्या हेलिकॉप्टरची तपासणीसुद्धा करावी. प्रत्येक उमेदवाराला २८ लक्ष खर्चमर्यादा आहे. या खर्चमर्यादेचे पालन उमेदवारांनी करावे. मतदानाच्या तोंडावर धनाचे आमिष दाखवून मतदारांना आकर्षित केल्या जाते. असे प्रकार घडल्यास त्याविरूद्ध कडक कारवाई करावी.
आयकर विभागाचे श्रवण कुमार म्हणाले, रोख रकम १० लाखांपेक्षा जास्त पकडल्यास त्वरित आयकर विभागाला कळवावे. त्यावर आयकर विभाग पुढील कारवाई करेल. जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. पाटील म्हणाले, संपूर्ण निवडणूकी प्रकियेत पोलीस विभागाचे सहकार्य प्रत्येक पथकाला राहणार आहे. पथकाने कारवाई करताना पोलीसांच्या समन्वयाने करावी. जिल्ह्यात २३ तपासणी नाके उभारण्यात आले आहे. यापैकी ४ नाके आंतरराज्यीय आहे. तपासणी नाक्यांचे लोकेशन प्रत्येक पथकाने आपल्या मतदारसंघनिहाय माहिती करून घ्यावे. यानंतर खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल श्री. जाधव यांनी उपस्थितांना खर्च नोंदीबाबत प्रशिक्षण दिले. याप्रसंगी विधासनभा मतदारसंघातील नियुक्त कर्मचारी, जिल्हास्तरीय समित्यांचे प्रमुख उपस्थित होते.