

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) या देशातील अग्रगण्य सार्वजनिक दूरसंचार संस्थेच्या रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त जळगाव बीएसएनएल भवन येथे विविध उपक्रमांनी भरलेला उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा गौरव, पर्यावरण जागरासाठी वृक्षारोपण, जनजागृतीसाठी भव्य रॅली, तसेच समाजोपयोगी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
उत्सवाची सुरुवात सकाळी केक कापून आनंद साजरा करण्याने झाली. यानंतर बीएसएनएल भवन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शहरात जनजागृतीसाठी बीएसएनएल भवन ते नवीन बस स्थानक स्वतंत्र चौक मार्गे एक भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये बीएसएनएलचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार राजू मामा भोळे उपस्थित होते. त्यांनी बीएसएनएलच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री राखीबाई खडसे व खासदार स्मिताताई वाघ यांनी दिलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. बीएसएनएलच्या अथक सेवेचे आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे त्यांनी विशेष उल्लेख केले.
या कार्यक्रमात बीएसएनएलमध्ये उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत, अशा सार्वजनिक संस्थांच्या विकासात कर्मचाऱ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
दुपारी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेक कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि आयोजकांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
बीएसएनएलचा रोप्य महोत्सव हा केवळ संस्थेच्या स्थापनेचा उत्सव नव्हता, तर सार्वजनिक सेवेच्या मूल्यांचा, कर्मचारी समर्पणाचा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रतीक ठरला. भविष्यात बीएसएनएल अधिक सक्षम आणि तंत्रस्नेही बनो, अशी अपेक्षा या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आली.



