पाचोरा-नंदू शेलकर । बुलेटवर तरूण बसलेला… अचानक बोलेरो कारची बुलेटला धडक… तरूणासह बुलेटला १५ ते २० फूट फरफटत नेले.. अज्ञात हल्लेखोरांना खाली उतरून तरूणावर शस्त्राने सपासपवार करून निर्घृण केला खून…रक्ताच्या थारोळ्यात पाहून चुलत भावाने केला आक्रोश…अशी थरारक घटना पाचोरा तालुक्यातील अतुर्ली नं ३ गावातील तरूणासोबत एरंडोल तालुक्यातील उत्राण-भातखंडे परिसरात सकाळी घडली आहे. सुपारी देवून खून केल्याचा संशय परिसरातून व्यक्त केला जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंतुर्ली नं.३ येथील सचिन उर्फ देविदास पाटील (वय – ३९) हा रविवारी १९ मार्च रोजी सकाळी सात वाजता घरातून कुणास काही एक न सांगता आपल्या बुलेट गाडीवरुन गिरणा नदीपात्रातील भातखंडे ते उत्राणकडे जाण्यासाठी निघाला होता. दर्ग्याजवळ आल्यानंतर मोटारसायकलवर बसून पुर्वेकडे तोंड करून उभा असलेला सचिन पाटील यांच्या मागवून भरधाव वेगाने आलेल्या बुलेरो गाडीने बुलेटसह त्यास जोरदार ठोस देवून १५ ते २० फुट फरफटत नेले. त्यात सचिन हा बुलेटहून खाली कोसळल्यानंतर बुलेरो वाहनातून उतरुन अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या छातीवर, मानेवर व बरगड्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन सचिन ह्यास जमिनीवर कोसळल्यानंतर बुलेरो घेऊन पसार झाले. काही वेळाने सचिनच्या चुलत भावास घटनास्थळाहून फोन आल्यानंतर तो घटनास्थळी पोहचला असता त्यास सचिन हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. मात्र एकास त्याच्या हाताची नस सुरू असल्याने तो जीवंत असल्याचे सांगत पाचोरा येथील खाजगी दवाखान्यात आणले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्यांला मृत घोषीत केले. दरम्यान घटनास्थळी अनेक उपस्थित नागरीकांनी सुमारे ३० मिनीट त्यास उपचारासाठी दाखल न करता बघ्याची भूमिका घेतली व रुग्णवाहिकेस उशीरा आल्याने त्यास प्राणास मुकावे लागले. मयत सचिन यांचे पाश्चात्य वृद्ध आई, एक भारतीय सैन्य दलात सेवा देत असलेला भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. घटनेप्रकरणी कासोदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध कासोदा पोलिस घेत आहेत.
सुपारी देवून हत्या केल्याचा संशय
दरम्यान, मयत सचिन पाटील याने गेल्या आठवड्यात गिरड येथील एकाला बेदम मारहाण केली होती. त्याच्यावर गुन्हा करण्यात आला होता. या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. तीन दिवसांपुर्वीच सचिनची जामीनावर सुटका करण्यात आली होती. अगदी नियोजनबध्द व सुपारी देवून तरूणाची हत्या केल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे. मृतदेह जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.