तेलंगणामध्ये बीआरएसला धक्का; विधानपरिषदेचे ६ आमदार काँग्रेसमध्ये

हैदराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तेलंगणात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत. बीआरएस पक्षाला लागलेली गळती थांबत नाही. विधानसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत ६ आमदारांनी पक्षाला रामराम केला. गुरुवारी विधान परिषदेचे ६ आमदार बीआरएस सोडून काँग्रेसमध्ये सहभागी झाले आहे.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या आमदारांना पक्षाचं सदस्यत्व दिले. या ६ आमदारांमध्ये विठ्ठल दांडे, भानु प्रसाद राव, एम.एस प्रभाकर, बोग्गरापु दयानंद, येग्गे मल्लेशम आणि बसवाराजू सरैया यांचा समावेश आहे. मागील वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आगामी काळात आणखी काही आमदार सत्ताधारी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. २ दिवसांपूर्वी बीआरएसला मोठा धक्का बसला होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार के केशव राव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नवी दिल्लीत पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत केशव राव यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. तेलंगणात झालेल्या पराभवानंतर बीआरएस पक्षाचे आमदार सातत्याने पक्ष सोडत आहेत. त्याशिवाय हैदराबादच्या महापौर विजया लक्ष्मी आर गडवाल यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Protected Content