भाऊंचे उद्यानात ‘भूमिपुत्र-भाऊ’ व ‘काव्यरत्नावली’ प्रदर्शनाचे लोकार्पण

RTM 4035

जळगाव, (प्रतिनिधी)।  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या तृतीय श्रद्धावंदनदिनानिमत्त जैन इरिगेशन व भवरलालजी आणि कांताई जैन परिवारातर्फे भाऊंचे उद्यानात ‘भूमिपुत्र-भाऊ’ व ‘काव्यरत्नावली’ प्रदर्शनाचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी संघपती दलीचंदजी जैन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, डॉ.सुसील मुन्सी, कविवर्य ना.धों. महानोर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगावच्या महापौर सीमा भोळे, राजा मयूर, नाना वाणी, गिरीधारीलाल ओसवाल, डॉ. सुभाष चौधरी, नितीन बरडे, माजी महापौर नितीन लढ्ढा, अनिल जैन, अजित जैन, अतुल जैन यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर व जैन परिवारातील सदस्य उपस्थीत होते.

‘भूमिपुत्र-भाऊ’ शब्दचित्र पुष्पांजली – ‘सार्थक करूया जन्माचे, रूप पालटू वसुंधरेचे’ हे जीवन-लक्ष्य असलेल्या मोठ्या भाऊंच्या प्रेरणेतून उभारण्यात आलेले भाऊंचे उद्यान शहराचे ऑक्सीजन पार्क म्हणून अल्पावधीत नावारूपास आले आहे. याठिकाणी साहित्यिक, कविंच्या कवितांसोबतच भवरलालजी जैन यांचे प्रेरणादायी विचार असलेले शब्दचित्र पुष्पांजली ‘भूमिपुत्र-भाऊ’ या उपक्रमाचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यात पद्मश्री भवरलालजी जैन यांच्या जीवनावर आधारित संग्रहित छायाचित्रे आणि माहिती देण्यात आली आहे. तसेच भवरलालजी जैन यांचे प्रेरणादायी वाक्य (कोट) प्रदर्शित करण्यात आले आहेत.
यावेळी प्रास्ताविकात अनिल जैन यांनी भूमिपुत्र-भाऊ या प्रदर्शनाच्या मांडणीमागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, भाऊंच्या नावाने हे उद्यान आहे, मात्र उद्यानात येणाऱ्या बाहेरील नागरिकांना भाऊंच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने ‘भूमिपुत्र-भाऊ’ हे प्रदर्शन साकारले आहे. तसेच युवकांमध्ये मराठी कवितांबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी, यासाठी मराठी साहित्यातील संत आणि साहित्यिकांच्या कविता प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.

मराठी साहित्य-भाषा-संस्कृतीच्या संवर्धनासाठी कान्हदेशाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्यांनी मराठी कवितेची ज्योत सातत्याने तेवती ठेवली, त्यातील काही कवितांचे प्रातिनिधीक दर्शन म्हणजे ‘काव्यरत्नावली’ आहे. भाऊंचे उद्यानात उभारण्यात आलेल्या या प्रदर्शनात मराठीतील निवडक कविंच्या कवितांचा आस्वाद जळगावकरांना घेता येणार आहे. प्रदर्शनातील कवितांची निवड कविवर्य ना.धों.महानोर यांनी केली आहे.

उलगडला कवितेचा इतिहास

भाऊंच्या उद्यानामध्ये असलेल्या काव्यरत्नावली प्रदर्शनात विविध संत, साहित्यिकांच्या कविता पाहता येणार आहेत. यामध्ये संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, फादर स्टीफन्स, सय्यद महंमद, शाहीर सगनभाऊ, केशवसुत, पठ्ठे बापूराव, भा. रा. तांबे, बहिणाबाई चौधरी, दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी, बालकवी, माधव ज्यूलियन, साने गुरूजी, सोपानदेव चौधरी, ना.घ. देशपांडे, बा.सी. मर्ढेकर, पुरूषोत्तम शिवराम रेगे, बा.भ. बोरकर, कुसुमाग्रज, बी.रघुनाथ, इंदिरा संत, विंदा करंदीकर, ग.दि. माडगुळकर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, राजा महाजन, सुरेश भट, ग्रेस, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे, ना.धों. महानोर, यशवंत मनोहर, प्रकाश किनगावकर, भुजंग मेश्राम, अशोक कोतवाल, इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख, प्रकाश होळकर, श्रीधर नांदेडकर, प्रज्ञा पवार यांच्यासह काही मान्यवरांच्या कवितांचा समावेश आहे.

Add Comment

Protected Content