जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावसह राज्यातील बेपत्ता झालेल्या मुलींचा तपास करून याची वस्तुस्थिती राज्य सरकारने जाहीर करावी अशी मागणी मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने केली आहे.
शहरातील मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने ५ पानी निवेदनात मुख्यमंत्री, गृहमंत्री, महिला व बाल विकास मंत्री, राज्य महिला आयोग,पालकमंत्री जळगाव जिल्हा, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी जळगाव व पोलीस अधीक्षक जळगाव यांना निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य विधानसभा अधिवेशन मधील महिला व बालकल्याण विकास मंत्री यांचे राजकीय वक्तव्य, नुकताच प्रदर्शित झालेला द केरला स्टोरी व नुकतीच प्रसिध झालेली बेपत्ता मुलींची अधिकृत माहिती हे वाचून अत्यंत वेदना झालेल्या आहेत.
यात पुढे म्हटले आहे की, राज्यातील जानेवारी२३ मध्ये १६००,फेब्रुवारीमध्ये १८१० व मार्च मध्ये २२०० अशा प्रकारे मुली बेपत्ता झाल्याचे अधिकृत माहिती प्रसिद्ध झालेली आहे. तीन महिन्यात ५६१० मुली बेपत्या झाल्या असून त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांनी सदर प्रकरणी त्वरित दखल घेऊन तपास करावा व वस्तूस्थिती माहिती सादर करावी.
यामध्ये पुढे म्हटले आहे की, मार्च २३ मध्ये ज्या २२०० मुली बेपत्ता आहे त्यात जळगाव जिल्ह्यातील ८१ मुलींचा सहभाग आहे. या ८१ मुली मध्ये १८ वर्षा वरील मुलींचा व महिलांचा समावेश आहे. १८ वर्षाखालील मुलींची संख्या यात नमूद केलेले नाही. सरासरी विचार केला तर एका महिन्यात ८१ मुली बेपत्ता होतात तर एका वर्षात सुमारे १००० मुली बेपत्ता होत असाव्यात. यामुळे महाराष्ट्र राज्यातील ३ महिन्याची सरासरी ५६१० मुली आहे तर त्या वर्षाला २२००० च्या वर जाते व कोणी चित्रपट निर्मात्याने चित्रपट तयार करण्याचा विचार करून १० वर्षानंतर चित्रपट तयार केला तर त्यात तो २२२००० मुली महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्याची माहिती सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करेल.
एवढेच नव्हे तर द जळगाव स्टोरी हा सिनेमा कोणी तयार करण्याचा प्रयत्न केल्यास एका महिन्यात ८१ मुली जळगावतून बेपत्ता होतात तर एका वर्षात ती संख्या सरासरी ९७० होईल व दहा वर्षानंतर सिनेमा काढल्यास ही संख्या १२ हजाराच्या वर जाईल अशा प्रकारे मुलींच्या बेपत्ता होण्यास जातीय विखारी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाईल असे या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात पुढे नमूद केले आहे की, द केरला स्टोरी च्या ट्रेलर मध्ये ३२००० मुलींची संख्या दाखवली प्रत्यक्षात फक्त तीन मुली असल्याचे चित्रपट निर्म्यात्याने कबुल केले हे जरी खरे असले तरी कोणत्याही दहशतवादाकडे दुर्लक्ष करता कामा नये. परंतु विपर्यास्त मांडणी केली जाते, त्यामागे काही पूर्वनियोजित कारस्थान आहे हे देखील लक्षात घेतले पाहिजे. मुलींचा बेपत्ता होण्याचा मुद्दा काळजीचा आहे परंतु त्याकडे वस्तुनिष्ठ पद्धतीने पाहिले जाणे आवश्यक आहे. मुलींना गर्भातच मारले जाते, हुंड्यासाठी विवाहितेला जाळले जाते, यावर भाष्य करायचे नाही परंतु धार्मिक विखार निर्माण करून सिनेमा मोफत दाखवायचा म्हणजे चर्चा वेगळ्या दिशेने न्यायची हे त्यावरील उत्तर नाही. हा प्रश्न गंभीर आहे परंतु त्याचे अचूक निदान झाल्या खेरीज आपल्याला उपचार सापडणार नाही.
म्हणून महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्य महिला आयोग, पोलीस महासंचालक, जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार सुरेश भोळे,जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना यांनी बेपत्ता झालेल्या मुलींचा तपास करून वस्तुस्थिती अहवाल जनतेसमोर आणावा व बेपत्ता होणे मागे जो कोणी व्यक्ती, संघटना, समाज असेल त्याच्यावर त्वरित कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हा अधिकारी व आमदार यांना निवेदन
शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हा अधिकारी रवींद्र भारदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले तर शिष्टमंडळाचे निमंत्रक फारूक शेख यांनी आमदार सुरेश भोळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
निवेदनावर यांच्या आहेत स्वाक्षरी
जळगाव जिल्हा मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, राष्ट्रीय कॉंग्रेसचे सरचिटणीस बाबा देशमुख, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, हुसेनी सेना चे अध्यक्ष फिरोज शेख, मनसेचे अध्यक्ष जमील देशपांडे, ए. यु. सिकलगर फाउंडेशनचे अध्यक्ष अन्वर खान, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान आदींच्या स्वाक्षर्या आहेत.