Home क्राईम वनविभागात लाचखोरी; वनपाल मॅडम सह इतर दोघे एसीबीच्या जाळ्यात !

वनविभागात लाचखोरी; वनपाल मॅडम सह इतर दोघे एसीबीच्या जाळ्यात !


पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बेकायदेशीर लाकूड वाहतूक केल्याच्या आरोपाखाली पकडलेला ट्रक सोडण्याच्या मोबदल्यात चक्क १ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा वन विभागाच्या वनपाल महिला अधिकारी, एका वन कर्मचाऱ्यासह एका खासगी इसमावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार, २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पारोळा पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

यातील मूळ तक्रारदारांच्या भावाने शेतातील निंबाची झाडे तोडून लाकूड एका ट्रकमध्ये भरले होते. हे लाकूड मालेगाव येथे घेऊन जात असताना, सावित्री फटाके फॅक्टरी, रागोर नजीक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही ट्रक पकडला. वनपाल वैशाली गायकवाड यांनी ही लाकूड वाहतूक बेकायदेशीर असल्याचे सांगून १४ ऑक्टोबर २०२४ रोजी ट्रक ताब्यात घेतला. हा ट्रक श्रीकृष्ण सॉ मिल, पारोळा, येथे लावून देण्यात आली होती.

अडीच लाखांची मागणी, तडजोडीअंती १ लाख:

गाडी पकडल्यानंतर तक्रारदार आणि त्यांच्या भावाने वारंवार लोकसेवक वैशाली गायकवाड आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची भेट घेऊन गाडी सोडण्याची विनंती केली. तेव्हा वैशाली गायकवाड यांनी सदर गाडी सोडण्यासाठी सुरुवातीला अडीच लाख रूपयांची लाच मागितली. अखेरीस, तडजोडीअंती लोकसेवक वैशाली गायकवाड आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी १ लाख इतकी लाचेची रक्कम श्रीकृष्ण सॉ मिलचे मालक सुनील धोबी (खासगी इसम) यांच्याकडे देण्यास सांगितले.

लाचेची मागणी सिद्ध:

तक्रारदार यांनी १० डिसेंबर २०२४ रोजी या संदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारावर पंच साक्षीदारांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान, वनपाल वैशाली गायकवाड, एका वन कर्मचाऱ्यासह खासगी इसम सुनील धोबी यांनी सदर लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात १ लाख लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले.

त्यानुसार, पारोळा पोलीस ठाण्यात वनपाल वैशाली गायकवाड, श्रीकृष्ण सॉ मिल मालक सुनील धोबी आणि एक वन विभागाचा कर्मचारी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound