रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराने तक्रारदाराला तपासामध्ये मदत करण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी चक्क २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून संबंधित हवालदाराविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक छोटे व्यापारी असून त्यांनी शेतकऱ्यांकडून सुमारे १ लाख २७ हजार रुपये किमतीचा केळीचा माल खरेदी केला होता. हा माल त्यांनी दिल्लीतील व्यापाऱ्यास विकला. मात्र, शेतकऱ्यांची देय रक्कम चुकती न केल्यामुळे, संतप्त झालेल्या काही शेतकऱ्यांनी निंभोरा पोलीस ठाण्यात या व्यापाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

शेतकऱ्यांनी केलेल्या याच तक्रारीची चौकशी निंभोरा पोलीस ठाण्याचे हवालदार सुरेश पवार यांच्याकडे होती. या चौकशीचा गैरफायदा घेत हवालदार पवार यांनी तक्रारदार व्यापाऱ्याला मदत करण्यासाठी आणि त्यांच्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल न करण्यासाठी लाचेची मागणी केली. सुरुवातीला त्यांनी तक्रारीतील रकमेच्या १० टक्के म्हणजेच सुमारे १२,७०० रुपये मागितले.
या भ्रष्ट मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ७ ऑक्टोबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्याकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने केलेल्या पडताळणीत, हवालदार सुरेश पवार यांनी चौकशीत मदत करण्याच्या बदल्यात २० हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्टपणे निष्पन्न झाले. या पडताळणीनंतर हवालदार सुरेश पवार यांच्याविरोधात रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पथकाने केली कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, पो.हे.कॉ. किशोर महाजन, महिला पो.हे.कॉ. संगिता पवार, पो. कॉ. राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आणि भूषण पाटील यांनी ही महत्त्वपूर्ण कारवाई केली.



