जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बसस्थानक आवारात शासकीय जागेतील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी तक्रारदार उषाबाई नामदेव पाटील यांनी गुरूवार १८ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथील बसस्थानक जवळील शासकीय जागेवर काहींनी अतिक्रमण करत पक्क्या स्वरूपाचे बांधकाम करण्यात आले आहे. हे अतिक्रमण काढावे, बसस्थानकाची जागा मोकळी करावी म्हणून तक्रारदार उषाबाई पाटील यांनी सुरूवातील कजगाव ग्रामपंचायतीकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर महिलेने हे अतिक्रमण काढण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करू असा इशारा १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले होते.
त्याबाबत भडगाव तहसीलदार विजय बनसोडे यांनी गंभीर दखल घेत कजगाव ग्रामपंचायतीला त्याच दिवशी लेखी पत्र पाठवून अतिक्रमण काढण्याचे सक्त आदेश देण्यात आले होते. परंतू आदेशाची अद्यापर्यंत कोणतीही दखल घेतली गेली नाही. अखेर तक्रारदार उषाबाई पाटील यांनी गुरूवार १८ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास थेट जिल्हाधिकारी कार्यालयात येवून अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी सुदैवाने जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे महिला पोलीसांनी धाव घेवून महिलेला ताब्यात घेतले व पुढील अनर्थ टळला.