छत्रपती संभाजीनगर । लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगरातील मुकुंद नगरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, अतिक्रमण काढण्यासाठी आलेला महापालिकेचा जेसीबी पेटवून देण्यात आला आहे.
आधी जेसीबीच्या काचा फोडण्यात आल्या आणि त्यानंतर हा जेसीबी अक्षरशः पेटवून देण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून शहरातील अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक महत्वाच्या रस्त्यांवरील आणि चौकातील अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे. दरम्यान, अशीच काही कारवाई करण्यासाठी बिडबायपासजवळ असलेल्या मुकुंदनगर परिसरातील जिजाऊ नगर, राज नगर भागात महानगरपालिकेच अतिक्रमण विरोधी पथक पोहचले होते.
यावेळी या भागात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या घराचा अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेल्यानंतर मोठा विरोध झाला. एवढंच नाही तर महानगरपालिकेच्या जेसीबीवर आधी दगडफेक आणि त्यानंतर जेसीबी पेटवून देण्यात आले आहे. ज्यात जेसीबी पूर्णपणे जळून खाक झाला आहे.