जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्या आणि शैक्षणिक संस्थाचालक वैशालीताई सुर्यवंशी यांचे फेसबुक अकाउंट अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याचा प्रकार बुधवारी १९ मार्च रोजी उघडकीस आला. या प्रकरणी सुर्यवंशी यांनी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून, अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३१ जानेवारीपासून हॅकिंगचा प्रकार सुरू
वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रोफाईल लिंक असलेल्या फेसबुक अकाउंटचा पासवर्ड बदलण्यात आला होता. हे अकाउंट ३१ जानेवारी ते १९ मार्चदरम्यान हॅक करून त्याचा गैरवापर केल्याची माहिती मिळाली आहे. १९ मार्च रोजी हॅकरने सुर्यवंशी यांच्या प्रोफाईलवरील डीपी बदलून त्याठिकाणी एका शिल्पमूर्तीचा फोटो ठेवला. तसेच, काही नाणे, ऐतिहासिक शिल्प आणि वास्तूंचे फोटो त्यांच्या अकाउंटवर अपलोड करून शेअर करण्यात आले.
आपले अकाउंट हॅक झाल्याचे लक्षात येताच वैशालीताई सुर्यवंशी यांनी तातडीने जळगाव सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात हॅकरविरोधात गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे.
सायबर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू केला असून, हॅकिंगसाठी कोणत्या साधनांचा वापर करण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे. तसेच, हॅकरचा शोध घेण्यासाठी तांत्रिक विश्लेषण आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.