Home क्राईम ब्रेकींग : लग्नाचे आमिष दाखवून पोलीसाकडून महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

ब्रेकींग : लग्नाचे आमिष दाखवून पोलीसाकडून महिलेवर अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

0
316

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फेसबुकच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन अनेक वर्षे एका महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. कोलकाता येथील पीडित महिलेने केलेल्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबातील तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेला नितीन सपकाळे हा या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ती २०१७ पासून नितीनच्या संपर्कात होती. त्याने आपण अविवाहित असल्याचे भासवून तिच्याशी मैत्री केली आणि लग्नाचे आमिष दाखवले. या आश्वासनावर विश्वास ठेवून पीडित महिला अनेकदा कोलकाताहून जळगावला आली. या काळात नितीनने तिला विविध हॉटेल्समध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.

२०२० मध्ये पीडित महिलेला नितीन विवाहित असून त्याला एक मुलगी असल्याचे समजले. तरीही नितीनने तिच्याशी पत्नीला घटस्फोट देऊन लग्न करण्याचे आश्वासन दिले आणि फसवणूक सुरूच ठेवली. २०२१ ते २०२५ या काळात त्याने वेळोवेळी अत्याचार केले. अखेरीस, २०२५ मध्ये त्याने महिलेसोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.

या घटनेनंतर, नितीन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी महिलेला धमकावले आणि एका मंदिरात जबरदस्तीने तिचे लग्न लावून दिले. परंतु नंतर हे लग्नच झाले नसल्याचे सांगून तिला सोडून दिले. या धक्कादायक फसवणुकीची जाणीव झाल्यावर पीडित महिलेने वकिलांच्या मदतीने मंगळवार, २३ सप्टेंबर रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या फिर्यादीनुसार, पोलिसांनी संशयित आरोपी नितीन सपकाळे, त्याची पत्नी आणि आई यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


Protected Content

Play sound