चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातून वाहणाऱ्या तितूर नदीपात्रात एका व्यक्तीने उडी घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. रात्री उशीरापर्यंत त्याचे शोधकार्य सुरू होते. गोविंदा पवार (वय ४४) असे नदीपात्रात उडी घेणाऱ्या इसमाचे नाव असून, घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय यंत्रणा आणि अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
गोविंदा पवार या व्यक्तीने तितूर नदीपात्रात नेमकी कशासाठी उडी घेतली, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या घटनेमुळे नदीकाठी मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच, रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या साहाय्याने संपूर्ण नदीपात्रात शोध मोहीम राबवली. अंधार आणि नदीतील पाण्याचा प्रवाह यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते, तरीही शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, रात्री उशिरापर्यंत गोविंदा पवार यांचा शोध लागलेला नव्हता.

या दुर्दैवी घटनेनंतर घटनास्थळी गोविंदा पवार यांच्या पत्नीचा हृदयद्रावक आक्रोश पाहायला मिळाला. पतीची शोधाशोध सुरू असतानाच, त्यांच्या रडण्याने उपस्थितांचे मन हेलावून गेले.
दरम्यान, भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांनीही घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नदीपात्रातील शोधकार्याची पाहणी केली आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. खासदार वाघ यांनी कुटुंबाला धीर दिला. प्रशासनाने ही शोधमोहीम पुढील दिवसही सुरू ठेवावी आणि संबंधित व्यक्तीचा शोध घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.



