ब्रेकींग न्यूज : मासिक व ग्रामसभा न घेतल्याने महिला सरपंच अपात्र !

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. यात धरणगाव तालुक्यातील कंडारी बुद्रुक गावातील महिला सरपंच यांनी मासिक व ग्रामसभा न घेतल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 7 व 36 नुसार सरपंच पदावरून अपात्र केल्याचे आदेश नुकतेच काढले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील कंडारी बुद्रुक गावातील ग्रामपंचायतीवर सन २०२१ मध्ये महिला सरपंच म्हणून कौसरबी हिलाल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली होती. शासनाच्या नियमानुसार सरपंच पदावर असताना मासिक सभा व ग्रामसभा घेण्याचे अनिवार्य ठरलेले आहे. दरम्यान कौसरबी पटेल यांनी आपल्या सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्रामपंचायतमध्ये मासिक व ग्रामसभा न घेतल्याची तक्रार उपसरपंच शकील वेडू पटेल आणि तायेर अब्दुल पटेल यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.

त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी धरणगाव आणि पारोळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार गटविकास अधिकारी यांनी कंडारी बुद्रुक ग्रामपंचातय येथे जावून याची सखोल चौकशी करून तसा अहवाल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे सादर करण्यात आला होता. चौकशी अंती सरपंच म्हणून पदावर काम करत असलेल्या कौसरबी हिलाल पटेल यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम सात व 36 नुसार ग्रामपंचायतीमध्ये मासिक व ग्रामसभा न घेतल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी यांनी अपात्र घोषित केले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतेच आदेश काढले आहे. या घटनेमुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.तक्रारदारांच्या बाजूने ॲड.विश्वासराव भोसले यांनी कामकाज पाहिले.

Protected Content