जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील मुसळी फाटा येथे पडलेल्या दरोडयाप्रकरणी २ संशयित अटक करण्यात आलेले असून आणखी ४ फरार संशयितांचा शोध सुरू आहे. यात ४ वाहने जप्त करण्यात आले असून ४८ लाख जमा करण्यात आली आहे, याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली. अशी अनिल उर्फ बंडू भानुदास कोळी (वय ३२) आणि दर्शन भगवान सोनवणे (वय २९) दोन्ही रा. विदगाव ता.जळगाव अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्या सोबत असलेले इतर चार संशयित मात्र फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील प्रेरणा हॉलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील उपस्थित होते.
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथील दुर्गेश इम्पेक्स जिनींगमधून शेतकऱ्यांना देण्यासाठी १ कोटी ६० लाख रुपये घेवून तीन कर्मचारी कारने जळगावहून धरणगाव जात होते. दुपारच्या सुमारास मुसळी फाट्याजवळ त्यांच्या कारला समोरुन येणाऱ्या कारने धडक दिली. अपघातानंतर लागलीच चौघांनी चालकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकली आणि लोखंडी रॉडने मारहाण करीत त्यांच्याकडील १ कोटी ६० लाखांची रोकड घेवून चोरटे तेथून पळ काढला. भरदिवसा जिनिंगची रोकड लुटल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुप्त माहिती आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अनिल उर्फ बंडा कोळी रा.विदगाव याचे नाव समोर आले होते. अनिल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील ५ गुन्हे दाखल असल्याने पथकाने त्याचा शोध घेत मुसक्या आवळल्या. चौकशी केली असता अनिल उर्फ बंडा कोळी याने आपल्या साथीदारांसोबत महिनाभर जिनिंगमधील कर्मचारी व मालकांच्या हालचालीची रेकी केली. यामध्ये ते कुठल्या दिवशी बँकेत येतात, कधी आणि किती कॅश कोणत्या रस्त्याने घेवून जातात, ही संपुर्ण माहिती गोळा केल्यानंतर अनिल याने दरोड्याचा प्लॅन रचला होता. एका गुन्ह्यात जिल्हा कारागृहात असतांना त्याची ओळख घरफोडीमधील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारासोबत झाली होती. त्याला भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांशी बंडा याची ओळख झाली होती. बंडा हा जामीनावर बाहेर आल्यानंतर त्याने उल्हासनगर येथील दरोडा टोळीशी संपर्क प्लॅन अंमलात आणला. दोघांना सोमवारी धरणगाव येथे न्या.सूर्यवंशी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना पुढील तपासाकामी दि.२२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक गणेश वाघमारे, कर्मचारी विजयसिंग पाटील, विजय पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, महेश महाजन, अकरम शेख, राहूल पाटील, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, रफिक शेख, लक्ष्मण पाटील, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, संदिप सावळे, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, अनिल जाधव, हेमंत पाटील, राहुल बैसाणे, दर्शन ढाकणे, महेश सोमवंशी, अभिलाषा मनोरे, रजनी माळी, वैशाली सोनवणे, रवी नरवाडे, संजय हिवरकर, राजेश मेंढे, कमलाकर बागुल, संदिप पाटील, गोरख बागुल, प्रविण मांडोळे, अनिल देशमुख यांचे पथक वेगवेगळ्या दिशेने रवाना केले होते.