मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावर दुचाकीस्लिप झाल्याने दुचाकीस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी २५ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. तर त्याच्यासोबत असलेला दुसरा तरूण सुदैवाने बचावला आहे. या घटनेबाबत मुक्ताईनगर पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. अनिल छोटू डागोर वय-४०, रा. रामदेव बाबा नगर, मलकापूर, जि. बुलढाणा असे मयत झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, अनिल छोटू डागोर हा तरुण आपला मित्र अभिषेक टाक याच्यासोबत मंगळवारी २५ जून रोजी दुपारी मलकापूरकडून भुसावळकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाले होतते. त्यावेळी मलकापूरहून जळगावकडे जाणारा ट्रॅक्टर घेऊन जाणारा कंटेनर पुढे जात होता. दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार अनिल डागोर याने कंटेनरला ओव्हरटेक करत असताना रस्त्यावर पडलेल्या पाण्यामुळे त्याची दुचाकी स्लिप झाली. त्यामुळे तो कंटेनरच्या क्लीनर भागाच्या मागच्या चाकात आल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाला. तर मागे बसलेला अभिषेक टाक थोडक्यात बचावला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनास्थळी मुक्ताईनगर पोलिसांनी धाव घेतली व मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयत हा मलकापूर येथील रेल्वे स्टेशनचे साफसफाईचा ठेका घेवून आपला उदरनिर्वाह करत होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.