जळगाव/एरंडोल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गुजरात राज्याकडून अकोला येथे जाणाऱ्या लक्झरी बसचा धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ महामार्गावर अपघात झाल्याने पलटी होऊन महिला प्रवाशीचा जागीच मृत्यू झाला तर इतर प्रवासी जखमी झाल्याची घटना मंगळवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमींना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही गुजरात राज्यातील सुरत येथून लक्झरी बस क्रमांक (जीजे ०१ डीवाय ५५०२) ही सोमवारी २३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता एरंडोल मार्गे ती मलकापूर येथे जाण्यासाठी निघाली. दरम्यान लक्झरी बसच्या वर साड्यांचे गाठोडे ठेवण्यात आलेले होते. दरम्यान मंगळवारी २४ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास लक्झरी बस एरंडोलमार्गे जळगावकडून मलकापूर येथे जात असताना धरणगाव तालुक्यातील वराडसिम गावाजवळ साड्यांचे गाठोडे एका साईडला झाल्याने चालकाचे लक्झरी बसवरील नियंत्रण सुटले आणि लक्झरीबस डिव्हायडर ओलांडून पलीकडे जाऊन पलटी झाली. या अपघातात कविता सिद्धार्थ नरवाडे (वय-३०, रा. भीम नगर, उधना, गुजरात) या प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर सोपान नारायण सपकाळ (वय-५४, रा. नरवेल ता. मलकापूर), विठ्ठल अमृत कोगदे (वय-७५, रा.पळशी ता. बाळापूर जि. अकोला), विश्वनाथ नामदेव वाघमारे (वय-६५ रा.वरणगाव), प्रशांत गजानन धांडे (वय-३३, रा.नरवेल ता. मलकापूर) यांच्यासह इतर ८ ते १० प्रवासी हे जखमी झाले आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत कार्य करत खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मयत झालेल्या कविता नरवाडे यांच्या मृतदेहाचा पंचनामा केला आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला.
पतीच्या उपचारापूर्वीच महिलेवर काळाचा घाला
दरम्यान कविता नरवाडे या आपले पती सिद्धार्थ शामराव नरवाडे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी नांदुरा येथील भावाकडे तीन मुलांना घेऊन लक्झरी ने प्रवास करत होत्या. पतीवर उपचारापूर्वीच त्यांच्यावर काळाचा घाला घातला असून त्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती सिद्धार्थ नरवाडे, मुलगा राज आणि दोन मुली खुशी आणि तनु असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.