चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरून दुचाकीवरून २० हजार रूपये किंमतीचे एमडी (MEPHEDRONE) ड्रग्ज विक्रीच्या उद्देशाने फिरत असलेल्या एका मालेगाव येथील तरूणाला मुद्देमालासह अटक करण्यात आले आहे. ही कारवाई चाळीसगाव शहर पोलीसांनी केली आहे. त्याच्याकडून जवळपास १२ ग्राम एमडी जप्त करण्यात आले. शेख मोहम्मद आरीफ उर्फ शादाब मोहम्मद जमील (वय-२३) रा. भिवंडी ता. ठाणे ह.मु. जिरे बाबा दर्ग्याजवळ, मालेगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील मालेगाव रोडवरील पुलाच्या खाली एक तरूण एमडी ड्रग्ज (MEPHEDRONE) विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकीवर फिरत असल्याची गोपनिय माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाला त्यांनी कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने मंगळवारी ७ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सापळा रचून संशयित आरोपी शेख मोहम्मद आरीफ उर्फ शादाब मोहम्मद जमील याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ विक्रीसाठी आणलेले २० हजार रूपये किंमतीचे १२ ग्रॅम एमडी (MEPHEDRONE) ड्रग्ज आढळून आले. पोलीसांनी त्याला अटक केली असून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोकॉ आशुतोष सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विनोद भोई, पोहेकॉ पंढरीनाथ पवार, पोहेकाँ राहुल सोनवणे, पोहेकॉ संदीप पाटील, चापोहेकॉ नितीन वाल्हे, पोना मुकेश पाटील, पोना महेंद्र पाटील, पोना भुषण पाटील, पोकॉ रविंद्र बच्छे, पोकॉ ज्ञानेश्वर पाटोळे, पोकॉ महेश बागुल, पोकॉ संदिप पाटील, पोकॉ आशुतोष दिलीप सोनवणे यांनी केली आहे.