चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लवकर श्रीमंत होण्याची स्वप्ने अनेकांची आहे, कुणी चांगल्या मार्गाने तर कुणी गुन्ह्याच्या स्वरूपातून प्रयत्न करत असतो. याच पध्दतीने चोपडा तालुक्यातील देव्हारी गावात राहणाऱ्या एकाने शेतात बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करून लाखो रूपये कमविण्याची स्वप्ने अडावद पोलीसांनी हाणून पाडला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६० हजार रूपये किंमतीचे ६ किलो ओला गांजा जप्त करण्यात आला आहे. हैदर शामा बारेला वय ४८ रा. देव्हारी ता. चोपडा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील देव्हारी शिवारातील शेतातील बांधावर संशयित आरोपी हैदर बारेला याने गांजाची लागवड केली असल्याची गोपनिय माहिती अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यानुसार अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता कारवाई करत शेतातून ओला, हिरवे आणि गांजाची झाडे असा एकुण ६ किलो ओला गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेल सतिष भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी हैदर बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करीत आहे.