जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात दहशत माजवणाऱ्या आणि घातपाताच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव शहर पोलिसांनी यशस्वीरित्या हाणून पाडला आहे. पोलिसांनी सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या टोळीतील चार सदस्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ गावठी पिस्तुल आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या गुन्हेगारांची ज्या परिसरात त्यांनी दहशत माजवली होती, त्याच परिसरात पोलिसांनी धिंड काढल्यामुळे भाईगिरी करणाऱ्यांमध्ये धडकी भरली असून, या कारवाईचे नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे.

शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना, त्यांना गेंदालाल मिल परिसरातील माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या घरासमोर काही संशयास्पद व्यक्ती दिसल्या. पोलिसांनी त्यांना थांबवून चौकशी केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. यावेळी एकाच्या कमरेला लोड केलेला गावठी कट्टा सापडला. तसेच, त्यांच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, त्यात आणखी एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी तात्काळ टोळीतील चौघांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या कारवाईत पोलिसांनी युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३), सोहील शेख उर्फ दया सीआयडी (वय २९), निजामोद्दीन शेख हुसेनोद्दीन शेख (वय ३१) आणि शोएब अब्दुल सईद शेख (वय २९) या चार मुख्य संशयितांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी गेंदालाल मिल परिसरात दहशत माजवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने या चौघांची त्याच परिसरातून पायी धिंड काढली.



