धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळकडून धरणगावकडे जाणाऱ्या राज्य महामार्गावर, मुसळी फाट्याजवळील हॉटेल अर्जुनापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास एका बांधकाम कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर फिल्मी स्टाईलने हल्ला करून लेबर कॉन्ट्रॅक्टरकडील ३० हजार रूपयांची रोकड लूटून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनंजय शंकर पाटील (वय ४२, रा. खौंडामळी, जि. नंदुरबार) यांनी यासंदर्भात धरणगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पाटील हे श्री पद्मावती कंस्ट्रक्शन कंपनीमध्ये प्लांट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. कंपनीचे काम संपवून ते लेबर कॉन्ट्रॅक्टर शंकर नरसिंग बामनीया यांच्यासह पाच कामगारांना घेऊन खामगाववरून बडवाणी (मध्यप्रदेश) येथील प्लांटकडे जात होते.

दरम्यान, बुधवारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता मुसळी फाट्याजवळील हॉटेल अर्जुना येथे जेवण केल्यानंतर ते धरणगावकडे निघाले. हॉटेलपासून थोड्याच पुढे मुसळी गावाच्या बोर्डाजवळील वळणावर त्यांच्या गाडी (क्र. MP-13-ZU-9420) ला पांढऱ्या रंगाच्या हुंडाई (क्र. MH-14-LX-8515) कारने अचानक ओव्हरटेक करून आडवी लावली. कारमधून उतरलेल्या चार अज्ञात इसमांनी धनंजय पाटील, शंकर बामनीया आणि मनीष परमार यांना गाडीतून बाहेर ओढून बेदम मारहाण केली. मारहाणीदरम्यान, एका हल्लेखोराने लेबर कॉन्ट्रॅक्टर शंकर बामनीया यांच्या खिशातून ३० हजार रूपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतले. जाताना, “पोलिसांत गेल्यास जिवंत सोडणार नाही,” अशी जीवे मारण्याची धमकी देत हल्लेखोर पसार झाले.
हल्लेखोर निघून गेल्यावर घाबरलेल्या पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने गाडी धरणगावकडे दामटवली. हल्लेखोरांनी पाठलाग केल्याचे लक्षात येताच, त्यांनी थेट धरणगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. धरणगाव पोलिसांनी चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.



