जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नातेवाईकांना भेटण्यासाठी मुलासह दुचाकीने जात असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने येणाऱ्या चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता नेरी गावानजीक घडली आहे. समाधान वना चौधरी वय ४० रा. वराड ता.धरणगाव असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील वराड येथे समाधान चौधरी हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून ते आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. रविवारी २० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता समाधान चौधरी हे आपला मुलगा दुर्गेश समाधान चौधरी वय १४ यांच्या सोबत पहूर येथे नातेवाईकांनी भेटण्यासाठी वावडदा मार्गे दुचाकी ने जात असतांना नेरीगावानजीक समोरून येणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एमएच २० एफजी ५३६४) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार समाधान चौधरी हे जागीच ठार झाले तर मुलगा दुर्गेश चौधरी हा गंभीर जखमी झाला. जखमी दुर्गेशला खासगी वाहनातून जळगावातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर मयत समाधान चौधरी यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. प्रसंगी त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. मयताच्या पश्चात आई मंगलबाई, भऊ, पत्नी कल्पना, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.