
अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील गांधली येथील २१ वर्षीय गौरव रविंद्र बोरसे या तरुणाने प्रेमप्रकरणातून टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपवले आहे. मारवड-निम रस्त्यावरील क्रीडा संकुलानजीक च्या स्मशानभूमीजवळ गळफास घेवून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली. गौरवच्या आत्महत्येपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात त्याने तरुणाईला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे.

व्हिडिओमध्ये गौरवने सांगितले की, त्याला प्रेमात धोका मिळाला आहे. या अनुभवातून त्याने इतर तरुणांना भावनिक आवाहन केले आहे. “कोणत्याही तरुणाने प्रेमाच्या आहारी न जाता, आपल्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावे,” असा मोलाचा सल्ला गौरवने दिला आहे. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत त्याने भविष्यातील पिढीला योग्य मार्ग निवडण्याचे आवाहन केले.
या धक्कादायक घटनेपूर्वी गौरवने आपल्या आई-वडिलांची माफी मागितली आहे, ज्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका क्षुल्लक प्रेमाच्या फसवणुकीमुळे एका उमद्या तरुणाने आपले आयुष्य संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गौरवने मरण्यापूर्वी दिलेला हा संदेश सध्याच्या तरुणाईसाठी एक विचार करायला लावणारा आहे. प्रेमभंगामुळे जीवनाचा अंत करणे हा उपाय नसून, जीवनात शिक्षण आणि करिअरला प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे, या घटनेबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ विनोद भोई हे करीत आहे.



