Home प्रशासन ब्रेकींग : रावेर बाजार समितीचे सभापती व उपसभापती “पायउतार” !

ब्रेकींग : रावेर बाजार समितीचे सभापती व उपसभापती “पायउतार” !

0
337


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तांतर होऊन भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी झाले आहे. माजी आमदार अरुण पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर लगेचच झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये, सभापती सचिन पाटील आणि उपसभापती योगेश पाटील यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव १४ विरुद्ध शून्य मतांनी मंजूर झाला. त्यामुळे दोघांनाही आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीमधील कारभारावरून संचालक मंडळात नाराजी होती. सभापती सचिन पाटील आणि उपसभापती योगेश पाटील हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत नाराज संचालकांनी ११ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. याच ठरावावर चर्चा करण्यासाठी बाजार समितीच्या हॉलमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.

ही विशेष सभा पारदर्शकपणे पार पडावी यासाठी बाजार समितीच्या आवारात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सभेच्या दोन्ही गेटवर पोलिसांची छावणीच उभारली होती. सहायक निबंधक जे.बी. बारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. त्यांना कमलेश पाटील, प्रदीप महाजन, महेंद्र गाढे आणि फकिरा तडवी यांनी सहकार्य केले.

या विशेष सभेला संचालक प्रल्हाद पाटील, मंदार पाटील, डॉ. राजेंद्र चौधरी, पंकज पाटील, राजेंद्र चौधरी, पितांबर पाटील, सौ. मनिषा पाटील, सौ. सविता पाटील, जयेश कुयुटे, गणेश महाजन, पांडुरंग पाटील, सिकंदर तडवी, रोहित अग्रवाल, आणि विलास चौधरी हे उपस्थित होते. विशेष म्हणजे, ज्यांच्या विरोधात ठराव होता ते माजी सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील आणि संचालक योगीराज पाटील, सैय्यद अजगर सैय्यद तुकडू हे मात्र या सभेत अनुपस्थित होते.

या सत्तांतरामुळे बाजार समितीतील महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली असून, आता बाजार समितीवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. यामुळे रावेर तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेते नंदकिशोर महाजन यांनी हे सत्तांतर घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल उपस्थित संचालकांनी त्यांचे आभार मानले. माजी आमदार अरुण पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपची ताकद आणखी वाढल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.


Protected Content

Play sound