मुंबई-वृत्तसेवा | देवेंद्र फडणवीस केंद्रात जाण्याची शक्यता असून त्यांच्या जागेवर गिरीश महाजन यांची वर्णी लागण्याची शक्यता असून या संदर्भात टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.
नुकत्याच लागलेल्या लोकसभा निकालांमध्ये राज्यात महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारली असून महायुतीला मोठा धक्का बसला आहे. यात भाजपला सर्वात मोठा हादरा बसल्याने याचे पडसाद उमटू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. यानंतर ते काल दिल्लीत दाखल झाले असून रात्री उशीरा त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली. यानंतर आज दुपारी एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यासह महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांची खलबते सुरू झाली आहेत.
दरम्यान, फडणवीस यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपद अथवा भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. तर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले गिरीश महाजन यांची चर्चा सुरू झाल्याचे टिव्ही नाईनने आपल्या वृत्तात नमूद केले आहे.