वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको) अंतर्गत असलेल्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील एका वर्ग-१ अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. २ लाख २८ हजार रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदाराकडे ५ टक्क्यांप्रमाणे लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

भानुदास पुंडलिक लाडवंजारी (वय ५७) रा. नेहरू नगर, जळगाव असे गुन्हा दाखल झालेल्या वर्ग-१ अधिकाऱ्याचे नाव असून, तो दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रात अधीक्षक अभियंता या पदावर कार्यरत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे एका कंपनीतर्फे २१० मेगावॅट पॉवर प्लांटच्या ठिकाणी साईट सुपरवायझर म्हणून काम करत होते. त्यांच्या कंपनीने २८ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पॉवर प्लांटच्या तळाशी जमा होणारी राख उचलणे, मोडतोड, तेलाचे बरेल काढणे आणि वाहतूक करण्यासंबंधी काम केले होते. या कामाचे एकूण २ लाख २८ हजार ५४४ रुपयांचे बिल मंजुरीसाठी मुख्य अभियंता, बी.टी.पी.एस विभाग, दीपनगर यांच्याकडे पाठवण्यात आले होते.
हे बिल मंजूर करून देण्यासाठी आरोपी अधीक्षक अभियंता लाडवंजारी यांनी तक्रारदाराकडे बिलाच्या ५ टक्के दराने लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराने लाच देण्याची इच्छा नसल्याने तडजोडीअंती ५ हजार रुपयांची मागणी केली. या मागणीची तक्रार तक्रारदाराने २९ एप्रिल २०२५ रोजी जळगाव लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता, अधीक्षक अभियंता लाडवंजारी यांनी ५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवून भ्रष्ट मार्गाने लाभ मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांच्याविरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करत आहेत.



