सावदा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील एका शाळेतील मुख्याध्यापिकेसह लिपीकाला आज दुपारी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. महिला उपशिक्षिकेची प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापिका मनिषा पितांबर महाजन (वय-५७) आणि कनिष्ठ लिपीक आशिष यशवंत पाटील (वय-२७) दोन्ही रा खिरोदा ता. रावेर असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तक्रारदार यांची सून या खिरोदा येथील एका विद्यालयात उपशिक्षिका पदावर कार्यरत आहे. त्यांच्या सुनेने प्रसुती रजा मिळवण्यासाठी २ जून २०२५ रोजी अर्ज दिला होता. तक्रारदारांनी सुनेच्या सांगण्यावरून मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांची भेट घेतली असता, त्यांनी प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना ५ हजार रुपये प्रमाणे सहा महिन्यांसाठी एकूण ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदारांनी ७ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे तक्रार दिली. या तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केली असता, मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रति महिना ६ हजार रुपये प्रमाणे सहा महिन्यांचे एकूण ३६ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आज दुपारी २ वाजता मुख्याध्यापिकांच्या कक्षात सापळा रचण्यात आला. यावेळी मनिषा महाजन यांनी तक्रारदाराकडून ३६ हजार रुपये लाचेची रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली आणि ती कनिष्ठ लिपीक आशिष पाटील याला मोजण्यासाठी दिली. आशिष पाटील ही रक्कम मोजत असतानाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथील पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांनी केली. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.



