मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बर्हाणपूरवरून येत असलेल्या कंटेनरमधील गुटख्याचा मोठा साठा तालुक्यातील बर्हाणपूर चौफुली येथे रात्री पकडण्यात आल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात अवैध प्रकारे येणारा गुटखा हा मुक्ताईनगरमार्गे येत असून यावर अधूनमधून कारवाया होत असल्या तरी गुटख्याची वाहतूक ही पूर्णपणे बंद झालेली नाही. या अनुषंगाने मुक्ताईनगर तालुक्यात काल रात्री पुन्हा गुटख्याने भरलेला कंटेनर जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास नाशिक येथील आयजी यांच्या अंतर्गत असलेल्या पथकाने बर्हाणपूर चौफुलीजवळ एचआर ५५ एक्यू ३८७३ क्रमांकाच्या कंटेनरला अडवून तपासणी केली असता यात पूर्णपणे महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा आढळून आला. यामुळे संबंधीत पथकाने कंटेनरसह यातील गुटख्याचा साठा जप्त केला आहे. हा साठा नेमका किती रूपयांचा आहे याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसली तरी याचे मूल्य लाखोंच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.