भोपाळ । मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी अपेक्षेनुसार बहुमत चाचणीला जाण्याआधीच आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कमलनाथ सरकारला शुक्रवारी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होे. दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी काल रात्री बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारले. त्यामुळे आधीच अस्थिर झालेल्या कमलनाथ सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करणे अवघड जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक काही मंत्री आणि आमदारांनी पक्षाच्याविरोधात भूमिका घेत आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. मात्र विधानसभा अध्यक्षांनी हे राजीनामे स्वीकारले नव्हते. तथापि, काल रात्री बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यात आले आहे. यामुळे काँग्रेसचे संख्याबळ घटले असून कमलनाथ सरकारसमोरील अडचणी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे त्यांचे सरकार हे स्पष्टपणे अल्पमतात आल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, आज बहुमत चाचणीच्या आधीच कमलनाथ यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले. यात त्यांनी भाजपवर धनशक्तीचा प्रयोग करून लोकशाहीची हत्या करण्याचा आरोप केला. यानंतर त्यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली.