जळगाव प्रतिनिधी । राज्य शासनाने ब्रेक द चेनच्या अंतर्गत कडक निर्बंध लादले असून नियमांचे भंग करणार्यांना वाढीव दंडाची आकारणी करण्यात येणार असल्याचे आदेश जारी केले आहेत.
राज्य शासनाने आज ब्रेक द चेनच्या अंतर्गत नियम अजून कडक केले आहेत. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी याबाबतचे नोटिफिकेशन रात्री जाहीर केले आहे. यानुसार २२ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेपासून ते १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हे नियम लागू राहणार आहेत.
या नियमांच्या अंतर्गत सक्तीचे निर्देश देण्यात आलेले आहेत. याच्या अंतर्गत आता राज्य शासनाच्या ऑफिसेसमध्ये फक्त १५ टक्के कर्मचारीच राहणार आहेत. यामध्ये वैद्यकीय, आरोग्य आणि अन्य अत्यावश्यक खात्यांना वगळण्यात आलेले आहेत. तर अन्य खासगी आपत्कालीन सेवांमध्येही फक्त ५० टक्के कर्मचारी संख्येनेच काम करावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
विवाहासाठी कडक नियम लावण्यात आले असून कोणताही विवाह सोहळा हा फक्त दोन तासांमध्ये २५ लोकांच्या उपस्थितीत आटोपावा लागणार आहे. या नियमाचा भंग केल्यास तब्बल ५० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. बस तसेच अन्य खासगी वाहनांमध्ये फक्त ५० टक्के प्रवास क्षमतेनेच प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. याचा भंग करणार्यांना दहा हजार रूपयांचा दंड करण्यात येणार आहे.