गॅबोरोन -वृत्तसेवा । महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अभूतपूर्व आणि थरारक कामगिरी नोंदवली गेली असून ब्राझीलच्या वेगवान गोलंदाज लॉरा कार्डोसोने अवघ्या 3 षटकांत 9 बळी घेत क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नाव कोरले आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (पुरुष आणि महिला मिळून) एका डावात सर्वाधिक बळी घेण्याचा हा विक्रम ठरला असून क्रिकेटविश्वात या पराक्रमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
ब्राझील आणि लेसोथो यांच्यात बोत्सवानातील गॅबोरोन येथे झालेल्या सामन्यात कार्डोसोने आपल्या घातक गोलंदाजीने लेसोथोच्या फलंदाजांना अक्षरशः गुडघे टेकायला भाग पाडले. तिने केवळ 4 धावा देत 9 बळी घेतले, जे आतापर्यंत अशक्य मानले जात होते. याआधीचा विक्रम भूतानच्या सोमन येशेच्या नावावर होता, ज्याने डिसेंबर 2025 मध्ये 8 बळी घेतले होते, तर महिला क्रिकेटमध्ये इंडोनेशियाच्या आर. रोहमालियाने 2024 मध्ये 7 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली होती.

कार्डोसोच्या या कामगिरीतील विशेष बाब म्हणजे तिचा जबरदस्त स्पेल. दुसऱ्या षटकात गोलंदाजीस सुरुवात करत तिने पहिल्याच षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूंवर हॅटट्रिक घेतली. त्यानंतर पुढील षटकाच्या पहिल्याच दोन चेंडूंवर विकेट घेत सलग पाच चेंडूंमध्ये पाच बळी घेण्याचा पराक्रम तिने केला. तिच्या अचूक लाईन-लेंथ आणि वेगामुळे लेसोथोच्या फलंदाजांना धावा करणे तर दूरच, विकेट सांभाळणेही कठीण झाले.
कार्डोसोच्या या घातक गोलंदाजीमुळे लेसोथोचा संपूर्ण संघ अवघ्या 6.2 षटकांत केवळ 13 धावांवर गारद झाला. हा सामना एकतर्फी ठरला आणि ब्राझीलने 189 धावांनी दणदणीत विजय मिळवला. त्याआधी ब्राझीलने 8 गडी गमावून 202 धावा केल्या होत्या. मोनिक मचाडोने 41 चेंडूत नाबाद 69 धावांची दमदार खेळी केली, तर रॉबर्टा एव्हरीने 48 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
लॉरा कार्डोसोच्या या विक्रमी कामगिरीने टी-20 क्रिकेटमधील गोलंदाजीचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. एका डावात 9 बळी घेणे हे यापूर्वी अशक्य वाटत होते, परंतु कार्डोसोने ते वास्तवात उतरवले. तिचा हा पराक्रम केवळ एक विक्रम नसून क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण ठरला आहे, जो दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे.



